जाणून घ्या पिस्त्याचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन – सुकामेव्यापैकी एक असणाऱ्या पिस्त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज आपण त्याचे फायदे, औषधी गुणधर्मी आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत.

पिस्त्याची विविध नावं –

पिस्त्याला संस्कृतमध्ये म्युकुलका किवा निकोचक, हिंदीत पिस्ता, इंग्रजीत पिस्ताचिओनट आणि शास्त्रीय भाषेत पिस्तासिया व्हेरा या नावानं ओळखलं जातं.

पिस्त्याचे औषधी गुणधर्म –

पिस्ता हा चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचं पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.

पिस्त्याचे उपयोग –

1) पिस्त्यात जीवनसत्त्वातील थायमिन, नायसिन, रिबोफ्लेविन, कॅरोटीन हे घटक असल्यानं मज्जा संस्थेच्या कार्यासाठी पिस्त्याचं सेवन करणं उत्तम ठरतं. दुधामध्ये पिस्त्याची पूड टाकून प्यायल्यास मेंदूचं कार्य उत्तम प्रकारे चालतं. थकवा, नैराश्य ही लक्षणं जाणवत नाहीत.

2) स्मृतीभ्रंश, विस्मरण जाणवत असेल तर नियमितपणे 4-5 पिस्ते दुधात टाकून खावेत.

3) गुड कोलेस्ट्रॉल निर्माण होऊन हृदयविकार टाळण्यासाठी नियमित पिस्त्याचं सेवन करावं.

4) बदाम, पिस्ता, खडीसाखर दुधात घालून त्याची खीर बनवावी. ही खीर नियमितपणे रोज सकाळी सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहतं.

5) पिस्त्यात विपुल प्रमाणात लोह असल्यानं त्याच्या सेवनानं रक्त वाढतं.

6) पिस्त्याची फुलं ही श्वसननलिकेतील व फुफ्फुसातील वाढलेला कफ दूर करतात म्हणून जुनाट खोकला, सर्दी, दमा यावर ही फुलं गुणकारी ठरतात.

7) मिठाईच्या शोभेसाठी व चव वाढवण्यासाठी पिस्त्याचा वापर करावा. घरगुती आईस्क्रीम, केक, बिस्कीट करताना सजावटीसाठी पिस्त्याचा वापर करावा.

8) पिस्त्यात पौष्टीक घटक भरपूर असल्यानं त्याच्या सेवनानं जंतूविरूद्धची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळं लहान मुलांना व रूग्णांना नियमितपणे दुधातून पिस्ते द्यावेत.

ही काळजी घ्या

सहसा पिस्ते खारवून साठवण्याची पद्धत आहे. परंतु अशा प्रकारच्या पिस्त्याचं जास्त प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरतं. अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यानं त्यात असणारे पौष्टीक व औषधी घटक काही प्रमाणात नाश पावतात. म्हणून त्याऐवजी न खारवलेले साधे पिस्तेही बाजारात मिळतात. त्यांचा वापर करावा. तेही नुसतेच खाल्ले तरी शक्तीदायक, आरोग्यपूर्वक सकस असतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.