Black Fungus Outbreak : ब्लॅक फंगसला रोखण्यासाठी ‘या’ 3 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल – AIIMS चे प्रमुख डॉ. गुलेरिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस भारतात थैमान घालत असताना आता कोरोनाबाधितांना ‘ब्लॅक फंगस’ या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. याच ब्लॅक फंगसचा फैलाव देशातील विविध राज्यांत झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी महामारी म्हणून घोषित केले आहे.

एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी ब्लॅक फंगसबाबत माहिती दिली. यापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी तीन गोष्टींबाबत माहिती दिली आहे. जाणून घ्या काय आहेत त्या…

नियंत्रित ब्लड शुगर लेव्हल

तुमच्या शरीराच्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे आहे. विशेष करून ज्या लोकांना मधुमेह (डायबिटिज) अशांनी काळजी घ्यावी. पोषक आहार, व्यायाम आणि योग्यवेळी औषधांचे सेवन त्यामुळे याला नियंत्रित करता येऊ शकते.

स्टेरॉइड आणि ब्लड शुगर लेव्हल

जे लोक स्टेरॉइडवर आहेत त्यांनी ब्लड शुगर लेव्हल दररोज तपासणे गरजेचे आहे. ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने इम्युनिटी कमकुवत होते. ब्लॅक फंगस होण्यामागचे हेच मुख्य कारण आहे.

स्टेरॉईडचा वापर

स्टेरॉईडचा चुकीचा वापर हे या संसर्गाचे प्रमुख कारण आहे. डायबिटिस, कोरोना पॉझिटिव्ह आणि स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये या बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक असते. त्याला रोखण्यासाठी आपण स्टेरॉईडचा दुरुपयोग थांबवला पाहिजे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान स्टेरॉईडचा वापर वाढला आहे.

काय आहे ब्लॅक फंगस?

ब्लॅक फंगस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना याचा धोका जास्त असतो. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. ब्लॅक फंगस चेहरा, फुफ्फुस आणि मेंदूवर याचा परिणाम करतो. हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते.

कोरोना आणि ब्लॅक फंगसमध्ये काय आहे संबंध?

आपल्या शरीरातील इम्यून सिस्टिममध्ये ब्लॅक फंगसशी लढण्यासाठी आवश्यक घटक असतात. मात्र, जर व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असेल त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर बनते. त्यानंतर ब्लॅक फंगसचे इन्फेक्शन होऊ शकते. याशिवाय स्टेरॉईडचाही दुष्परिणाम यामध्ये दिसू शकतो.

काय आहेत याची लक्षणे?

डोळे-नाकात दुखणे किंवा लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, रक्ताची उलटी होणे हे प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. त्यामुळे या लक्षणांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.