माझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत जळगावात 10 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी

पोलिसनामा ऑनलाईन – राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत आतापर्यंत जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 10 लाख, 31 हजार 241 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. मोहिमेतंर्गत आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दोन हजार 532 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाची पथके जिल्ह्यातील 15 तालुक्यातील सहा लाख 50 हजार 602 घरांना भेट देणार आहेत. त्यानुसार 29 लाख, 21 हजार, 401 नागरिकांची 10 ऑक्टोबपर्यंत तपासणी करणार आहेत. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेट देणार आहेत. घरातील सदस्यांचे तापमान, प्राणवायू आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, प्राणवायू कमी असणे, अशी लक्षणे असणार्‍या नागरिकांना जवळच्या दवाखान्यात संदर्भित करण्यात येणार आहे. तेथे करोना चाचणी करून पुढील उपचार केले जाणार आहेत. कोमॉर्बिड असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात किंवा नाही याची खात्री करण्यात येईल. तसेच आवश्यक तेथे औषधोपचारासाठी नागरिकांना संदर्भित करण्यात येणार आहे. प्रत्येक पाच ते 10 पथकांमागे एक वैद्यकीय अधिकारी उपचार आणि संदर्भ सेवा देतील. याशिवाय घरातील सर्व सदस्यांना कोरोनाच्या परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.