खुशखबर ! आता मेडिक्लेम ‘तात्काळ’ मिळणार, IRDA नं आजारांची व्याख्याच बदलली, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जेव्हा कुणी आरोगयविमा घेत असते तेव्हा अनेक पूर्वीचे आजार सांगावे लागतात, तर काही आजार लपवून त्यावर विमा संरक्षण घेतले जाते. तसेच विमा संरक्षण घेतल्यानंतर पुढील आयुष्यात काही आजार उद्भवतात. अशा अनेक कारणांमुळे आरोग्यविम्याचा दावा निकाली काढण्यात खूप वेळ निघून जातो. त्यामुळे पॉलिसीधारकांना मोठा मनःस्ताप होत असतो. हा मनःस्ताप आता टळणार आहे. कारण विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) आरोग्य विम्यासंदर्भात पॉलिसीपूर्व आजारांची व्याख्या अधिक सुटसुटीत आणि सर्वांना समजेल अशा स्वरूपाची केली आहे. त्यामुळे विम्याचे दावे आता फेटाळले जाऊ शकणार नाहीत.

इरडाने सप्टेंबर २०१९ मध्ये पूर्वीचे किंवा आरोग्यविमा पॉलिसीपूर्व आजारांबाबतचे एक परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकात पॉलिसीच्या आधी असणाऱ्या आजारांसंदर्भात दोन शक्यतांवर आधारित व्याख्या देण्यात आली होती. यात विमा कंपन्यांना लागू करण्यात आले होते की, आरोग्यविमा पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीपूर्व आजारांची लक्षणे जर दिसून आल्यास त्याचा लाभ देण्यात येईल. मात्र इरडाने या व्याख्येतील हा भाग आता काढून टाकला आहे. गेल्या आठवड्यातच इरडाने यासंदर्भातील नवे परिपत्रक प्रसिद्ध केले होते.

मागील वर्षी सुधारलेली पॉलिसीपूर्व आजारांची (पीईडी) व्याख्या २७ सप्टेंबर २०१९ रोजी इरडाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्यविमा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट केली होती. या नवीन परिपत्रकानुसार पॉलिसी घेतल्यानंतर जर तीन महिन्यांनी एखाद्या आजाराचे निदान झाले तर त्या आजाराला पॉलिसीपूर्व आजार (पीईडी) समजले जाणार नाही. असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

इरडाचे माजी सदस्य आणि विमातज्ज्ञ नीलेश साठे यांनी एका वृत्तपात्राला सांगितले की, ‘पॉलिसीधारक पूर्वी जडलेल्या आजारांना पॉलिसी घेण्याच्या वेळी मोकळेपणाने सांगत नसतात. तसेच वैद्यकीय चाचणीत देखील या आजारांबाबत स्पष्ट निदान होत नाही. अशावेळी वैद्यकीय चाचणी अहवालानुसार पीईडी नाही, असा शेरा मारत जर आरोग्यविमा दिला, आणि त्यानंतर एखादा आजार झाला आणि त्यासाठी विम्याचा दावा करताना पीईडीच्या रकान्यात हा आजार पूर्वी झाला होता असे लिहिले तर त्या पॉलिसीधारकाला विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे याबाबतीत गैरसमज वाढत होते.’ या कारणामुळेच इरडाने आपल्या व्याख्येत बदल करून ती अधिक सुटसुटीत केली आहे. त्यामुळे विमा क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी असे मत व्यक्त केले आहे की, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.

इरडाच्या नव्या व्याख्येत खालील मुद्दे समाविष्ट आहेत –

– पॉलिसीपूर्व आजार (पीईडी) म्हणजे बिघडलेले आरोग्य, दीर्घकाळ असणारा आजार, जखम, व्याधी इ.

– निदान झालेल्या आजारासाठी नोंदणीकृत किंवा अधिकृत डॉक्टरने पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपूर्वी ४८ महिन्यांत उपचार सुचवले आहेत, किंवा असे आजार ज्याचे निदान आरोग्यविमा पॉलिसी देण्यापूर्वी ४८ महिन्यांत नोंदणीकृत किंवा अधिकृत डॉक्टकडून झालेले आहे.

इरडाकडून वगळण्यात आलेला मुद्दा –

आरोग्यविमा पॉलिसी काढल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत जर एखादा आजार जडला असेल तर तो पॉलिसीच्या दावा प्रक्रियेत पीईडी म्हणून सादर करता येईल. तसा तो केल्यास त्या पॉलिसीचा लाभ त्या आजारासाठी मिळेल. हा मुद्दा इरडाने वगळला आहे.