Corona virus Prevention Tips : ‘या’ 5 उपायांनी कमी करू शकता ‘कोरोना’चा धोका !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसने आता भारतातही प्रवेश केला असून दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातील पुणे येथेही दोन संशयित रूग्ण सापडले आहेत. चीनमधून ही महामारी संपूर्ण जगात पोहचली आहे. वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात एकुण 3,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास 90 हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

सर्वात मोठी समस्या ही आहे की, आतापर्यंत याच्यावर उपाय शोधण्यात यश आलेले नाही. चीन नंतर या व्हायरसने इराण, हाँगकाँग, जपान, इटलीसह अनेक देशात हाहाकार उडवला आहे. देशात आतापर्यंत एकुण पाच रूग्णांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी घ्या काळजी :

1. लोकांपासून दूर राहा :

तुम्ही ज्यांना भेटाल त्यांच्यापासून किमान 3 फुटाचे अंतर ठेवा. विशेष करून ज्यांना खोकला, ताप आहे अशा लोकांपासून दूर राहा. जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते किंवा खोकते तेव्हा हवेत व्हायरस पसरतो.

2. दिवसात अनेकवेळा हात धुवा :

दिवसात अनेकवेळा साबण आणि पाण्याने कमीत कमी वीस सेकंदपर्यंत हात धुवा. बॅक्टेरियांना मारण्यासाठी स्ट्राँग सॅनिटायझरचा वापर करू शकता.

3.  शिंकताना वापरा टीशू पेपर :

खोकताना आणि शिंकताना नेहमी तोंडावर टीशू पेपर ठेवा. यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये व्हायरस पसरणार नाही. हा टीशू ताबडतोब डस्टबीनमध्ये टाकून द्या.

4. तोंड, नाक, डोळे यांना सतत हात लावू नका :

डोळे, नाक, तोंडांला हात लावण्याची अनेकाना सवय असते. ही सवय बंद करा. कारण व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

5. ताप, सर्दीकडे दुर्लक्ष करू नका :

जर तुम्हाला खोकला, ताप, सर्दी असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. उशीर करू नका. लोकांमध्ये मिसळू नका, घरातच थांबा.