Coronavirus Vaccine : सर्वप्रथम कोणाला मिळणार ‘कोरोना’ लस ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूची प्रकरणे दोन कोटीपर्यंत पोहोचण्यापासून काहीच अंतर दूर आहेत, अशात वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञ या धोकादायक आजारासाठी लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या १६० पेक्षा जास्त लसी क्लिनिकल चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यापैकी २७ लसी मानवी चाचणी टप्प्यात पोहोचल्या आहेत.

लस तयार करण्याच्या शर्यतीत बऱ्याच लस आहेत, त्यामुळे वर्षा अखेरीस किंवा २०२१ च्या सुरूवातीला लस तयार होऊ शकेल, अशा योजना आखल्या जात आहेत. सध्या ऑक्सफर्डची लस ‘ChAdOx1 nCoV-19’ या शर्यतीत आघाडीवर आहे. ही लस चाचणीच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात आहे.

भारतातही होणार ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला डीजीसीआयकडून ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट, स्वीडिश-ब्रिटीश कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकासह भारत आणि इतर निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी कोविड-१९ ची लस तयार केली जाईल. कोव्हीशील्डची मानवी चाचणी करण्यासाठी (ऑक्सफर्डची कोविड लस) सुमारे १६०० स्वयंसेवकांना लसीचा डोस दिला जाईल.

कोणाला मिळणार सर्वप्रथम लस ?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिसीजचे संचालक अँथनी फौची यांना आशा आहे की, या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२१ च्या सुरूवातीस कोरोना विषाणूची लस एक ‘वास्तव’ ठरेल. हे लक्षात घेता कोविड-१९ ची लस प्रथम कोणाला मिळणार याची चर्चा वाढत आहे, कारण विकसित देशांनी लस उपलब्ध करुन देण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचे करार केले आहेत.

जगभरातील आरोग्य तज्ञांच्या मते, आरोग्यसेवा कर्मचारी आणि प्रथम प्रतिसाद देणारे कामगार यांच्यासह फ्रंट लाईन वर्कर्सना या संसर्गजन्य रोगापासून लसीकरण करण्यात प्राधान्य असेल. मात्र त्यानंतर गोष्टी कठीण होऊ शकतात, कारण लस प्रथम कोणाला दिली पाहिजे याबद्दल कोणतेही सरळ उत्तर नाही.

सर्वांसाठी लस उपलब्ध करणे सोपे नाही
डॉ. फ्रान्सिस कोलिन्स यांचा विश्वास आहे की, प्रत्येकाला याचे उत्तर आवडणार नाही, कारण प्रत्येकाला वाटते की ते प्रथम लस घेण्यास पात्र आहेत. मात्र डॉ. कोलिन्स यांनी एक महत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला, ज्याचा विचार करणे आवश्यक आहे, तो म्हणजे ज्या ठिकाणी महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे, त्या भागातही प्राधान्य दिले पाहिजे.

सीडीसी आणि डब्लूएचओचे काय म्हणणे आहे ?
आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा कर्मचार्‍यांसह प्रथम आवश्यक त्या कामगारांना लस देण्याची सूचना सीडीसीने केली आहे. त्यानंतर जास्त धोका असलेल्या श्रेणीतील लोक ज्यात ६५ वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आहेत आणि जे आधीच आजारी आहे, ते दुसऱ्या रांगेत असावेत.

तर डब्ल्यूएचओच्या मते, प्रथम लस आरोग्यसेवा कर्मचारी, ६५ वर्षांवरील लोक आणि जे यापूर्वीच आजाराने ग्रस्त आहेत, अशा लोकांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

मात्र अद्यापही कमी उत्पन्न असलेली लोकसंख्या, ज्यांच्यावर कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला आहे, त्यांना लस कधी दिली जाईल याचे उत्तर अद्याप कोणाकडेही नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like