‘या’ मंत्र्यांचा कार्यकाल संपल्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंकडे आणखी १ महत्वाचे खाते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील आणखी एक महत्वाचे समजले जाणारे आरोग्य खाते सोपविण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या आमदारकीचा कालावधी संपल्याने त्यांच्या खात्याचा कार्यभार शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. मंत्रिपद कोणाला द्यायचे हे शिवसेनेकडून आणखी निश्चित न झाल्याने शिंदे यांच्याकडे तात्पुरता अतिरिक्त खाते देण्यात आले आहे.

विधान परिषद सदस्य असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या सदस्यत्वाची मुदत गेल्या वर्षी जुलै महिन्यात संपली होती. मात्र त्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने त्यांना मंत्रिपदही सोडावे लागणार होते. त्यांनी त्यानुसार मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता, मात्र जोपर्यंत आपण सांगत नाही तोवर तुम्ही काम करीत रहा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या गोष्टीला सहमती दर्शवल्याने डॉ. सावंत मंत्रिपदावर कार्यरत होते. सदस्य नसतानाही काही विशिष्ट काळ मंत्रिपदावर काम करता येते, मात्र त्याचीही मुदत ७ जानेवारला संपणार होती. त्यानुसार सोमवारी डॉ. सावंत यांच्या खात्याचा कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

भाजप-शिवसेनेमध्ये सध्या टोकाचा वाद सुरू असल्याने शिवसेनेने या मंत्रिपदाकडे गांभिर्याने पाहिले नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य खाते देण्यात आले आहे, असे सुत्रांनी सांगितले.