Pune : 15 लाख 50 हजाराच्या धनादेशाचं प्रकरण ! बदनामीला कंटाळून आरोग्य विभागातील कर्मचार्‍याची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  15 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश घेऊन माहित नसलेल्या व्यक्तींशी संबंध जोडून समाजात बदनामी केल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार पेठेत बुधवारी (दि. 24) ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विजयानंद तांदळे (रा. किरकटवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यश तांदळे (वय 24, रा. किरकटवाडी) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धनंजय नानासाहेब घुले (रा. फुरसुंगी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजयानंद तांदळे हे शुक्रवार पेठेतील गाडीखाना येथील आरोग्य केंद्रामध्ये बिगारी म्हणून काम करीत होते. तर धनंजय घुले हा चालक म्हणून काम करीत आहे. दोघेही एकमेकांचे मित्र असल्याने त्यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार झाले होते. घुले याने तांदळेकडून 15 लाख 50 हजार रूपयांचा धनादेश घेतला होता. मात्र घुले याने त्याला माहित नसलेल्या व्यक्तीशी तांदळे यांचे संबंध जोडून त्यांची समाजात बदनामी केली. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून तांदळेंनी आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.