आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे उद्या लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरातील सीपीआर आवारात उद्या राज्य सरकारी चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या मागण्या मान्य न झाल्यास पुढेही आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सीपीआरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे गेल्या आठ महिन्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. वेळोवेळी निवेदनही देण्यात आली आहेत. तरीही आरोग्य प्रशासनाने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. केवळ तोंडी आश्वासन देण्यापलीकडे प्रशासनाने आजवर काहीही केलेले नाही. त्यामुळेच मंगळवारी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस गणेश आसगावकर यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील वर्ग ४ ची रिक्त पदे त्वरित भरावीत, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणारी बिंदुनामावली (रोस्टर) त्वरित अद्ययावत करण्यात यावी, प्रलंबित असलेली वारसा व अनुकंपा ही पदे त्वरित भरावीत, वर्ग चारमध्ये असणारी पदोन्नती शस्त्रक्रिया परिचर, डड्ढेसर, प्रयोगशाळा परिचर व इतर रिक्त पदोन्नती करण्यात यावी, अशा संघटनेच्या मागण्या असून यासाठी उपोषण करण्यात येणार असल्याचे आसगावकर यांनी सांगितले.