कॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या रिटा शहा करतात रूग्णांचे समुपदेशन

पोलासनामा ऑनलाईन – कॅन्सरशी यशस्वी झुंज देणाऱ्या रिटा शहा यांनी कॅन्सरवर मात केल्यानंतर केवळ आनंद व्यक्त न करता याच क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील रिटा शहा यांनी ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलांचं समुपदेशन करण्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप सुरू केला आहे.

रिटा शहा यांना २०१६ मध्ये स्तनांचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. हे समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यातच त्यांची मुलगी लहान असल्याने त्यांना खूपच काळजी वाटत होती. पण शेवटी त्यांनी घाबरून न जाता या आजाराशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. आणि ही लढाई जिंकली सुद्धा.

त्यांच्याप्रमाणेच इतर महिलांनी देखील या आजाराला समर्थपणे सामोरं जावं यासाठी त्यांनी आता पुढाकार घेतला आहे. कॅन्सर आयुष्याचा शेवट नाही हे रुग्णांना पटवून देण्यासाठी त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णांचं समुपदेशन करायला सुरुवात केली. त्यानुसार रिटा यांनी २०१८ मध्ये कॅन्सर रुग्णांसाठी काम करणाऱ्या नारायणदास मोरबाई बुधरानी ट्रस्ट मध्ये काम केलं. याशिवाय आता त्यांनी केईएम रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांचा एक सपोर्ट ग्रुप तयार केला आहे.

ब्रेसट कॅन्सरबाबत रिटा शहा म्हणाल्या, कॅन्सरवर शस्त्रक्रिया करून शरीरातील ज्या अवयवाला कॅन्सर आहे तो भाग काढून टाकावा लागतो. अशा स्थितीत अनेक महिलांचं ब्रेस्ट काढून टाकावं लागतं. अशावेळी समाजात वावरताना त्यांच्या मनात न्युनगंडाची भावना येते. याशिवाय कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यावर आता आपण मरणारच आहोत, अशी भावना मनात येते. या रुग्णांना आजाराशी झुंज देण्यासाठी बळ द्यावं यासाठी त्यांचं समुपदेशन करण्याचं काम आम्ही करत आहोत. याशिवाय रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधांसह त्यांचा आहारही उत्तम असावा यावर लक्ष ठेवलं जातं आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येतं. परळच्या केईएम रुग्णालयात २०१८-१९ या वर्षात रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या १०० महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण महिलांमध्ये अजूनही या आजाराबद्दल जागरूकतेचा अभाव दिसून येतो. या पाश्र्वभूमीवर कॅन्सर रुग्णांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट गुप्र तयार करण्यात आला आहे. हा सपोर्ट ग्रुप तयार होऊन एक वर्ष पूर्ण झाला असून यासंदर्भात केईएम रुग्णालयात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कॅन्सरशी यशस्वी झुंज देणाऱ्या अनेक रुग्णांनी आपले अनुभव शेअर केलेत.