Coronavirus : खुपच विचार करून पैसे खर्च करण्याची वेळ, तरी देखील ‘या’ गरजा पुर्ण करण्यासाठी खर्च आवश्यकच

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने देश आणि जगात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली असून जगातील बर्‍याच भागात लॉकडाऊन आहे. भारतामध्येही देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक कामे ठप्प झाली आहेत. यामुळे बर्‍याच लोकांसमोर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले असून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत कष्टाने कमावलेला पैसा अत्यंत विचारपूर्वक खर्च करावा लागतो. पण असेही काही खर्च आहेत जे तुम्ही थांबवू शकत नाही आणि थांबवू देखील नये. या जाणून घेऊया या परिस्थितीत देखील कशा प्रकारे तुम्ही पैसा खर्च केला पाहिजे…

१. टर्म इन्शुरन्स प्लॅन
लॉकडाऊनमुळे आपले उत्पन्न कमी होऊ शकते, नोकरी जाऊ शकते किंवा पगार कापला जाऊ शकतो. या कठीण परिस्थितीत तुम्हाला असे वाटेल की टर्म इन्शुरन्स प्लॅन किंवा लाइफ इन्शुरन्स पॉलिसी पैशांचा अपव्यय आहे आणि ती बंद केली पाहिजे. पण हे लक्षात घेतले पाहिजे की जर काही लोक आपल्या पगारावर अवलंबून असतील तर आपण ही योजना बंद करू नये. विश्वास ठेवा की यात थोडी रक्कम खर्च करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्यांचे भविष्य सुरक्षित करत आहात. म्हणून या कठीण परिस्थितीत टर्म इन्शुरन्स सुरू ठेवा.

२. आरोग्य विमा
आजच्या काळात आरोग्य विमा प्रत्येकासाठी आवश्यक आहे. सामान्यत: लोक आरोग्य विमा पॉलिसी विकत घेत नाहीत कारण त्यांना कंपनीकडून गट आरोग्य विमा पॉलिसी कव्हर मिळते. पण ज्या वेळी कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी रीट्रेंचमेंटसारखी पावले उचलत आहेत, त्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि वेळेत वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी घेतली पाहिजे. या कठीण परिस्थितीत हे फार महत्वाचे आहे, कारण घरातील कोणत्याही सदस्यासाठी तुम्हाला रुग्णालयात भरमसाठ बिल भरावे लागेल.

३. मोरेटोरियम टाळा
RBI च्या सूचनेनंतर बँका आणि अन्य वित्तीय संस्था कर्जाच्या हप्त्याच्या देयकावर त्यांच्या ग्राहकांना स्थगितीची सुविधा पुरवत आहेत. येथे हे लक्षात घ्यावे कि मोरेटोरियम हा हप्ता भरण्यासाठी उपलब्ध असलेला अतिरिक्त वेळ आहे, कर्जमाफी नाही. तसेच मोरेटोरियमच्या कालावधीसाठी व्याज द्यावे लागते. अशा परिस्थितीत मोरेटोरियम पर्याय निवडणे हे कर्ज घेण्यासारखे आहे. अशावेळी जेव्हा उत्पन्न पूर्णपणे बंद असते आणि जेव्हा आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो तेव्हाच हा पर्याय निवडा. अन्यथा विनाकारण अतिरिक्त व्याज द्यावे लागेल.