ऑफिसला पोहचण्यासाठी 1 तासाहून जास्त वेळ ‘प्रवास’ करता ? मग तुमच्यासाठी धोक्याची ‘घंटा’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना रोजच्या कामासाठी लांबच लांब असा धकाधकीचा प्रवास करावा लागतो. मुंबई सारख्या ठिकाणी तर लोक अक्षरशः ट्रेनच्या गर्दीमध्ये देखील तासंतास रोजचा प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. मात्र अशा लांब आणि धकाधकीच्या प्रवासामुळे तुम्हाला भविष्यामध्ये गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. अशी माहिती नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेमध्ये उघड झाली आहे.

दररोज लांब आणि जास्त प्रवास करणाऱ्यांना झोपेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दिवसभरातला बराचसा कालावधी कामात आणि प्रवासात गेल्यानं कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांचं शरीर निष्क्रीय होत जातं आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी कराव्या लागणारे व्यायाम करणं ते टाळू लागतात. आठवड्याला ४० तासांपेक्षा जास्त वेळ काम करणाऱ्या आणि दिवसाकाठी तासाभरापेक्षा जास्त काळ प्रवास करणाऱ्यांना थकवा येण्याचं प्रमाण २५ टक्के इतकं असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना थकव्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

सतत प्रवासात असणाऱ्या व्यक्तींना शारीरिक हालचाली कमी होतात त्यामुळे विविध व्याधी जडण्याचा धोका वाढत जातो. याशिवाय १६ टक्के लोकांना झोपेशी संबंधित आजार होण्याचादेखील धोका असतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या आणि हेलसिंकीमधल्या आरोग्य आणि कल्याण विभागाच्या जॅना हालोनेन यांनी ही माहिती दिली आहे.

२००८ ते २०१८ या कालावधीत २२ हजार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. दहा वर्षांच्या कालावधीत दोनवेळा त्यांच्या कामाची, प्रवासाला लागणाऱ्या वेळेची, झोपेची, मद्यसेवनाची, धूम्रपानाची माहिती घेण्यात आली. याशिवाय त्यांचं बॉडी मास इंडेक्सदेखील विचारात घेण्यात आलं. याबद्दलचं सर्वेक्षण करताना सरासरी ४८ वर्षांच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला.

अनेकांचं दिवसभराचं वेळापत्रक त्यांच्या कामाच्या वेळापत्रकावरुन ठरतं. त्यामुळे ऑफिस आणि प्रवासासाठी लागणाऱ्या कालावधीचा थेट संबंध आरोग्याशी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.त्यामुळे प्रवासासोबत आरोग्याच्या काळजीकडे लक्ष देणं सध्या खूप महत्वाचे बनत चालले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/