चार महिन्यात ‘कोरोना’वरील लस येईल, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   कोरोनावरील लस (coronavirus-vaccine) पुढील तीन ते चार महिन्यांत तयार होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी( health-minister-dr-harsh-vardhan) व्यक्त केला आहे.तसेच 135 कोटी भारतीयांना ही लस पुरविण्याचा प्राधान्य क्रम वैज्ञानिक मूल्यांकनावर निर्धारित केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

फिक्की एफएलओच्या एक वेबिनारला ते गुरुवारी संबोधित करत होते. लस देताना आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना वॉरियर्सना स्वाभाविकपणे प्राधान्य दिले जाईल. यानंतर वृद्ध तसेच आजारी लोकांना लस दिली जाईल. लसिकरणासंदर्भात मोठी योजना तयार केली जात आहे. याच्या ब्लूप्रिंटवर चर्चा करण्यासाठी एक ई व्हॅक्सीन इंटॅलिजेन्स प्लॅटफॉर्म तयार केले आहे. आशा आहे, की 2021 हे आपल्या सर्वांसाठी एक चांगले वर्ष ठरेल.

तसेच गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यात जनता कर्फ्यू, हा पंतप्रधान मोदींचा एक फारच चांगला प्रयोग होता. यात जनतेची राष्ट्रव्यापी भागीदारी होती. लॉकडाउन आणि अनलॉक लागू करणे, हे केंद्र सरकारच्या काही धाडसी निर्णयांपैकीच महत्वाचे निर्णय होते, असे ते म्हणाले.

या लढाईत सरकार अत्यंत सक्रीय होते

हर्षवर्धन म्हणाले, या लढाईत सरकार अत्यंत सक्रीय होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानतळे, बंदर, जमिनी सीमावर लक्ष ठेवण्यात आले. गेल्या 11 महिन्यातील कामांचा पाढा वाचताना, हर्षवर्धन म्हणाले, अत्यंत कमी वेळात कोरोना महामारीच्या प्रकोपाला नियंत्रित करणाऱ्या काही मोजक्या देशांत भारतही आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याला पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आणि एन -95 मास्कची कमी भासली. मात्र, काही महिन्यातच आपण या गोष्टी जगातील काही देशांना निर्यात करण्यात सक्षम झालो असल्याचे ते म्हणाले.