‘सरकार तिघांचे तरी संघटना वाढवा’

दाभोळ : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार आहे. असे असले तरी आपण एकीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व संघटना दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये वाढवून पक्षाला बळ देऊ, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

आरोग्यमंत्री टोपे हे तीन दिवसांच्या दापोली तालुक्‍याच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत. दापोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कारानंतर ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजीब रुमाणे, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, पंचायत समितीच्या उपसभापती ममता शिंदे, कर्देचे सरपंच सचिन तोडणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टोपे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेतृत्व हे चमत्कार करणारे आहे. हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. सर्वधर्म समभाव मानणारी ही राष्ट्रवादी असून, जातीयवादाला येथे थारा नाही. विकासकामे करत असताना गटबाजी करू नका. आपल्या भागाचा विकास करून घ्या, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

संजय कदम यांचे कौतुक
दापोली मतदारसंघामध्ये माजी आमदार संजय कदम यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांची नाळ सर्वसामान्य माणसांशी जोडलेली पाहायला मिळत आहे. सर्वांमध्ये मिसळणारा नेता असे म्हणत टोपे यांनी संजय कदम यांचे कौतुक केले.

आरोग्य खात्याचे सर्व प्रश्‍न मार्गी लावणार
दापोली मतदारसंघातील आरोग्य खात्याचे सर्व प्रश्‍न मार्गी लावणार असून, यापुढे रेशनकार्ड कोणत्याही रंगाचे असू दे, प्रसूती ही मोफतच होण्यासाठी दापोली शहरातील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलला रीतसर परवानगी देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

You might also like