Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर आरोग्यमंत्री टोपेंनी पुण्यात केल्या ‘या’ 5 मोठ्या घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना व्हायरस ही सर्वच देशांसाठी डोकेदुखी ठरत असून या व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. अनेक शहरांमध्ये विविध व्यवसाय बंद ठेवण्यापासून ते कोरोना बाधित रुग्णावरील उपचाराबाबत सरकारकडून वेगाने हालचाली करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत पाच महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. गर्दी टाळण्यासाठी एपिडेमिक कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, खासगी लॅबना अजून कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्या फक्त तीनच ठिकाणी कोरोनाची चाचणी करण्यात येते. नायडू रुग्णालयात 100 तर वायसीएम रुग्णालयात 60 बेड्स सुरु करण्यात आले आहेत. तर वर्क फ्रॉम होमची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या घोषणा
1. पुण्यातील 8 खासगी रुग्णालयांना विलगीकरणासाठी परवानगी.

2. राज्यातील क्वारन्टाईनसाठीचे बेड वाढवले.

3. आयसोलेशन वॉर्ड वाढवले.

4. कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात सुरु होणार 8 नव्या लॅब. उद्यापासून (गुरुवार) 4 नव्या लॅब सुरु होणार, हाफकिन्समध्येही होणार कोरोना व्हायरसची चाचणी.

5. लवकरच केंद्राकडून कोरोना व्हायरस संदर्भातल्या 10 हजार किट मिळणार.

राज्यातील मनपानिहाय रुग्णांचा तपशील
-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका – 10 रुग्ण

-पुणे महानगरपालिका – 8 रुग्ण

-मुंबई महानगरपालिका – 7 रुग्ण

-नागपूर महानगरपालिका – 4 रुग्ण

-यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण – प्रत्येकी 3 रुग्ण

-रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद – प्रत्येकी 1 रुग्ण

-एकूण रुग्णांची संख्या – 42

राज्यात 58 नवीन रुग्णांना भरती करण्यात आले असून कोरोना बाधित भागातून 1227 प्रवाशी आले आहे. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 958 जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यांपैकी 865 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 42 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत असून लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 1227 प्रवाशांपैकी 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरवठा पूर्ण झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.