Coronavirus in Maharashtra : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती, म्हणाले – ‘हवेच्या वेगाप्रमाणे प्रसार होतोय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. अडीच तास चाललेल्या या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या. यावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकांचा जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन जितका महत्त्वाचा आहे तितकेच लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेल्याना कशा प्रकारे मदत करता येईल याचे सूत्र निश्चित केले जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याच बैठकीत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली. वीकेंड लॉकडाऊन सुरु असतानाही मुंबई, नागपूर, पुणे सारख्या शहरांमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाचा प्रसार हवेच्या वेगाप्रमाणे होत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

टोपे म्हणाले, कोरोनाचा प्रसार ज्या वेगाने होत आहे. त्या वेगाने लसीकरणावर भर द्यावा लागणार आहे. सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे रुग्णालयातील आयसीयु आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे. त्यामुळे याचा वापर विचार करुनच करावा लागणार आहे. राज्याला प्रत्येक दिवशी सहा लाख लसींच्या डोसची आवश्यकता असल्याचे सांगत राज्याला महिन्यात एक कोटी लस लागतील असेही ते म्हणाले. या बैठकीत विरोधकांनीही काही सूचना मांडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करायला हवी. हे करत असताना संपूर्ण लॉकडाउन करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी विरोध केला.