Coronavirus : आता लक्षणविरहीत नागरिकांची होणार ‘कोरोना’ टेस्ट, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनही हादरून गेलं आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणूची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांची देखील टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दुसरीकडे, मास्कचा काळाबाजार करु नये. मास्कच्या किंमती स्थिर रहाव्यात यासाठी लवकरच सरकार भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्लोबल हॉस्पिटल गायकवाड प्रकरणाचा तपास पोलीस करत आहत. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर दोषीवर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 181 एवढी झाली आहे. तर 118558 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात 89313 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 9250 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.