राज्यात Lockdown 4.0 अटळ ? ‘रेड’ झोनचे ‘हे’ आहेत नवे नियम, आरोग्यमंत्र्यांची माहिती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपत आहे. परंतु लॉकडाऊन असताना देखील देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनला पर्याय नाही. या लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देत निर्बंध कसे कायम ठेवायचे याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्लॅन तयार आहे. तो त्यांनी केंद्राकडे सोपवला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नाशिकमध्ये बोलताना त्यांनी लॉकाडाऊन 4.0 टाळणं शक्य नाही असं सांगितलं. अंतरराज्य वाहतूक सुरु झाल्याने आता उलट रुग्णसंख्या वाढू शकते असा इशारा त्यांनी दिला आहे. बुधवारी राज्यात 1495 रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. तर सर्वात धक्कादायक आकडा मुंबईतून आला आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात 40 मृत्यूंची नोंद झाली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

1. आपल्याला कोरोनासोबत जगण्याची तयारी करावीच लागेल
2. नव्या लॉकडाऊनचे नियम वेगळे असतील, पण निर्बंध कायम राहणार
3. लॉकडाऊन प्रोटोकॉलचं पालन नागरिकांनी करावं
4. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्त्वाचं
5. येत्या दिवसात फक्त हॉट स्पॉट परिसर बंद असतील
6. धार्मिक स्थळं लवकर खुली होण्यासारखी परिस्थिती नाही
7. वैयक्तिक आणि सामूहिक स्वच्छता पाळणं आवश्यक
8. कोरोनारुग्णांच्या डिस्चार्जच्या नवीन गाईडलाईन पाळल्या जाणार आहेत
9. लक्षणं नसतील तर 10 दिवसात, टेस्ट न करता डिस्चार्ज देणार