घाबरायचं नाही ! ‘कोरोना’च्या नव्या स्ट्रेनवरही लस प्रभावी, आरोग्य मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला आहे. त्यात इंग्लंडहून भारतात परतलेल्या 6 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण समोर आले आहे. यातच, कोरोना लस नव्या स्ट्रेनवरही प्रभावी आहे, त्यामुळे नागरिकांनी या स्ट्रेनला घाबरण्याची गरज नाही, असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. त्यामुळे देशवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन मंगळवारी एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, लस यूके आणि दक्षिण अफ्रिकेत आढळणाऱ्या व्हेरिएन्टविरोधात काम करेल. कारण, सध्याची लस ही, या कोरोना व्हेरिएन्ट्सपासून बचाव करण्यात अयशस्वी ठरेल, याचा कसलाही पुरावा नाही. तर, केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, यूके व्हेरिएन्टचे वृत्त येण्यापूर्वीच, आम्ही प्रयोगशाळेमध्ये जवळपास 5,000 जीनोम विकसित केले होते. आता आम्ही त्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करणार आहोत.

तर ICMR चे डीजी प्रोफेसर बलराम भार्गव म्हणाले की, एक गोष्ट अत्यंत महत्वाची असून आपण व्हायरसवर फार अधिक प्रमाणात इम्यून प्रेशर टाकायला नको. जी थेरेपी लाभदायक आहे, तिचाच वापर आपण करायला हवा आणि जर फायदा होत नसेल, तर आपण त्या उपचारांचा वापर करायला नको. अन्यथा तसा उपचार व्हायरसवर प्रेशर टाकेल आणि तो अधिक म्यूटेट करेन.

तर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले, नव्या स्ट्रेनने अनेक देशांचा प्रवास केला आहे. अशात आपल्याला अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. व्हायरसचा प्रसार रोखणे सोपे आहे. कारण ट्रांसमिशनची चैन अद्याप लहान आहे. ते म्हणाले, परदेशातून येणाऱ्या 20 पैकी एका प्रवाशाची यूके व्हेरिएन्टची टेस्ट केली जाणार आहे.

सहा जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण –
कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली आहे. भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. इंग्लंडमधून भारतात परतलेल्या 6 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधून परतलेल्या 6 जणांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये 3 नमुने बेंगळुरू, 2 नमुने हैदराबाद आणि 1 नमुना पुण्यातील प्रयोगशाळेतील असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.