Coronavirus ‫Impact : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! देशातील स्विमिंग पूल, मॉल्स, शाळा 31 मार्चपर्यंत बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहता आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारनं काय पावलं उचलली याबाबत आरोग्य मंत्रालयानं माहिती दिली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी खबरदारी घेण्यासही सांगण्यात आलं. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात येत असलेलं अंतर 31 मार्च पर्यंत लागू ठेवण्याचाही प्रस्ताव दिला गेला आहे असंही आरोग्य मंत्रालयानं यावेळी सांगितलं.

सरकारकडून सांगण्यात आलं की, 31 मार्च पर्यंत स्विमिंग पूल, मॉल्स, शाळा बंद कराव्या, कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी करावा, लोकांमध्ये 1 मीटर अंतर ठेवणं, खबरदारी घेण्याच्या उपायांवर लक्ष देणं, सोबतच विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्लाही देण्यात आला. याशिवाय ऑनलाईन शिक्षणासाठीदेखील प्रोत्साहन देण्यावर जोर देण्यात आला. मंत्रालयानं सांगितलं की, सार्वजनिक वाहतूक आणि ट्रेन तसेच बस आणि विमानांचा वापर टाळावा.

भारतात अद्याप 114 केसेस
सरकारकडून सांगण्यात आलं की, कोरोना व्हायरसची नवीन चार प्रकरणं ओडिसा, जम्मू-काश्मीर, लडाख आणि केरळमधून समोर आली आहेत. भारतात अद्याप 114 प्रकरणं समोर आली आहेत. यात 13 जणांची प्रकृती ठिक झाली आहे आणि दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

या देशांवर बंदी
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, “इराणमधून 53 लोकांच्या चौथ्या बॅचला सोमवारी भारतात आणण्यात आलं आहे. या सर्वांना जैसलमेरच्या आर्मी फॅसिलिटीमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ज्यांना आज परत आणण्यात आलं आहे त्यात कोणालाही कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळलेली नाहीत. त्यांना ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार ठेवण्यात आलं आहे. युरोपीय संघ, तुर्की आणि युनायटेड किंग्डमच्या प्रवाशांना 18 मार्च 2020 पासून बंदी घातली जाईल. यावर पुन्हा आढावा घेतला जाईल.”