ब्रिटनमध्ये ‘कोरोना’ व्हायरसचा नवीन धोकादायक प्रकार अनियंत्रित, भारताने बोलावली आपत्कालीन बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने ब्रिटनमध्ये नवीन प्रकारचे धोकादायक रूप घेतले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराची ओळख पटल्याने यावर चर्चेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी संयुक्त देखरेख गटाची (जेएमजी) आपत्कालीन बैठक बोलावली. कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारामुळे ब्रिटनमध्ये संसर्ग वेगाने पसरल्याचे म्हटले जात आहे.

ब्रिटनच्या सरकारने व्हायरसचा नवीन प्रकार ‘नियत्रंणाच्या बाहेर’ गेल्याचा इशारा जारी केल्यानंतर युरोपीय युनियनच्या अनेक देशांनी ब्रिटेनहून येणार्‍या सर्व विमानांवर प्रतिबंध लावला आहे. तर, ब्रिटनने सुद्धा रविवारपासून कडक लॉकडाऊन लागू केले आहे.

पीटीआयने सूत्रांच्या संदर्भाने सांगितले की, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या एका नवीन प्रकारामुळे यावर चर्चेसाठी आरोग्य सेवा महासंचालकांच्या (डीजीएचएस) अध्यक्षतेखाली सोमवारी संयुक्त देखरेख गटाची बैठक होईल.

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रतिनिधी डॉ. रॉडरिको एच. ऑफ्रिन सुद्धा बैठकीत सहभागी होऊ शकतात, जे संयुक्त देखरेख गटाचे सदस्य आहेत.

दक्षिण इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर युरोपीय संघातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणार्‍या विमानांवर प्रतिबंध लावला आहे. जर्मनीसुद्धा ब्रिटनहून येणारी विमाने मर्यादित करण्याचा विचार करत आहे. तर नेदरलँडने किमान वर्षासाठी ब्रिटनहून येणार्‍या विमानांवर प्रतिबंध लावला आहे.

तर, बेल्जियमने रविवारी मध्यरात्रीपासून पुढील 24 तासांसाठी ब्रिटनच्या उड्डाणांवर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली आहे. सोबतच रेल्वे सेवांवरदेखील प्रतिबंध लावला आहे. ब्रिटनहून येणार्‍या उड्डाणांवर ऑस्ट्रिया आणि इटलीसुद्धा प्रतिबंध लावणार आहेत. बेल्झियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रू यांनी रविवारी म्हटले की, ते सावधगिरी म्हणून मध्यरात्रीपासून पुढील 24 तासांसाठी ब्रिटनहून येणार्‍या उड्डाणांवर प्रतिबंध लावत आहेत.