आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR टेस्ट नाही गरजेची; केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. रुग्णसंख्याही कमी होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, विविध राज्यांत लॉकडाऊनसदृश्य अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण आता केंद्र सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR टेस्ट गरजेची नसल्याचे सांगितले.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरात राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. 26 राज्यांत 15 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर 6 राज्यांत 5 ते 15 टक्के प्रकरण आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR टेस्ट करणे गरजेचे नाही. इतकेच नाही तर रुग्णालयातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देतानाही RT-PCR रिपोर्ट गरजेचा नाही. कोरोना संकटामुळे देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. दुसरा डोस घेणाऱ्या लोकांना राज्य सरकारने प्राथमिकता द्यावी. दुसरा डोस घेणारे लोक मोठ्या संख्येने प्रतिक्षा करत आहेत. आता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

राजेश भूषण यांनी पुण्याचे उदाहरण देत सांगितले, की नाईट कर्फ्यूनंतर 15 दिवसांचा कडक लॉकडाऊनमुळे मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे. मुंबईत कंट्रोल रुम बनवण्यात आले होते. ज्यामध्ये डॉक्टरही होते. तिथं फोन केल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात होते. त्यामुळे रुग्णाला बेड मिळण्यासाठी त्रास होत नव्हता. टँकर आणण्यासाठी आणि नेण्यासाठी कोणतीही अडचणी येऊ नये, म्हणून 500 वाहनचालकांना प्रशिक्षण दिले जात आहे, असेही ते म्हणाले.