देशात दर महिन्याला तयार होणार 20 लाख टेस्टिंग किट्स, ‘कोरोना’विरुद्ध लढाईसाठी भारताचं मोठं ‘प्लॅनिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जगच कोरोना व्हायरस विषाणूशी झुंझ देताना दिसत आहे. अद्यापही या रोगावर ठोस लस उपलब्ध झाली नाही. लस तयार करण्यासाठी जवळपास १०० देशात संशोधन सुरु आहेत. असे असताना कोरोनापासून वाचण्यासाठी दोनच सर्वात महत्वाचे उपाय आहेत. एक म्हणजे लॉक डाऊन आणि दुसरे म्हणजे कोविड -१९ टेस्टिंग किट. भारतासाठी एक चांगली बातमी अशी आहे की मे महिन्यापासून भारत दर महिन्याला जवळपास २० लाख कोरोना टेस्टिंग किट्स तयार करण्यासाठी सक्षम होईल. या 20 लाखपौकी 10 लाख किट्स रॅपिड अँटीबॉडी असतील तर 10 लाख आरटी-पीसीआरच्या असतील असे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने भारताचे महत्वपूर्ण पाऊल …

  • भारतातच टेस्टिंग किट तयार केल्यामुळे भारतावरील किटच्या आयातीचा बोजा कमी होईल.
  • देशात सध्या 6 हजार व्हेंटिलेटर तयार केले जात आहेत. ही संख्याही पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • लवकरच पीपीई आणि ऑक्सिजन डिव्हाईस सारख्या गोष्टीही ‘मेक इन इंडिया’च्या धरतीवर तयार करण्याची तयारही भारताने सुरू केली आहे.

विशेष रुग्णालयांची संख्या वाढणार

मोदी सरकार राज्यांच्या साथीने कोरोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालयांची संख्या वाढविण्यावरही काम करत आहे. देशात शुक्रवारपर्यंत 1919 कोरोना रुग्णालये होती. यात 672 रुग्णालये गंभीर रुग्णांसाठी तर 1247 रुग्णालये मॉडरेट लक्षणे दिसणाऱ्यांसाठी आहेत. देशात सध्या 1,73,746 आयसोलेशन वॉर्ड, 21,806 आयसीयू बेड्स तयार आहेत. आतापर्यंत 5 लाख रॅपिड किट्स चीनमधून भारतात पोहोचल्या आहेत. त्या राज्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.