हत्तीरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण : डॉ. रमेश गवाले

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन – हत्तीरोग नियंत्रण व निर्मुलनाचे ९४ टक्के उद्दिष्ट मुखेड तालुक्यात पूर्ण करण्यात आले असून २ लाख ७० हजार ६५८ नागरिकांना हत्ती रोग नियंत्रणाच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत, तसेच गोळ्यांचे सेवन करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांनी दिली आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख , जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २५ फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्यातील २ लाख ९० हजार ९२० लाभधारक असून २ लाख ७० हजार ६५८ लाभधारकांना हत्ती रोग नियंत्रणाच्या गोळ्या देण्यात आल्या. तालुक्यात १२९ ग्रामपंचायती अंतर्गत १५१ गावे, वाडी तांडे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र सात, ३४ उप आरोग्य केंद्र व मुखेड शहरात एक उपजिल्हा रुग्णालय, मुक्रमाबादला नागरी दवाखाना, कामजळगा येथे आयुर्वेदीक दवाखाना आहे. बाऱ्हाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५३ हजार ९८५, सावरगाव पि. येथील आरोग्य केंद्रात ५१ हजार ८२, चांडोळा आरोग्य केंद्रात १६ हजार १७४, जांब (बु.) केंद्रात १४ हजार ६०१, सावरमाळ केंद्रात ४३ हजार १५८, राजुरा बु. केंद्रात ३८ हजार ६०, बेटमोगरा केंद्रात २० हजार ६८०, उपजिल्हा रुग्णालयात २८ हजार ८६६ नागरिकांना हत्तीरोग नियंत्रणाच्या गोळ्या देण्यात आल्या.

मोहीमेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद पाटील, डॉ. शिवदास संगेवार, डॉ. आम्रपाली गायकवाड, डॉ. मारुती केंद्रे, डॉ. जगदीश गायकवाड, डॉ. बालाजी गरुडकर, डॉ. हाणमंत मेकेवाड, डॉ. विलास धनगे, डॉ. राजू सुनेवाड, डॉ. वर्षा कोरडे, डॉ. माया कापसे, हिवताप विभागाचे विस्तार अधिकारी व्ही. व्ही. माचनवाड, सचिन पांढरमिसे, आरोग्य सहाय्यक चंद्रकांत जाधव, राजकुमार ढवळे, श्रीमती रेखा रहाटकर, प्रवीण खलसे, नरसिंग गुरुफळे, शिवदास तोटेवाड, अमोल चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे, निळकंठ देवकर, ज्ञानेश्वर मोरे यांनी परिश्रम घेतले.

‘क्युलेक्स’ या मादी डासाने चावा घेतल्याने हत्तीरोग होतो. मृत्यू येत नसला तरी कायमचे अपंगत्व, विद्रुपता येणे, जननेंद्रिय व हाता पायासह इतर अवयवांवर सुज, वेदना, दु:ख जन्मभर सहन करावे लागते. वय वर्षे २ ते ५ वयोगटातील व्यक्तींना डीईसी एक गोळी व अल्बेन्डाझेल १ गोळीची मात्रा तर ६ ते १४ वयोगटासाठी दोन डीईसी गोळ्या १ अल्बेन्डाझेलची गोळी देण्यात आली. १५ वर्षे व पुढील नागरिकांसाठी डीईसीच्या तीन गोळ्या, व एक अल्बेन्डाझेलची गोळी देण्यात आली. गंभीर रुग्ण व गरोदर मातांनी ह्या गोळ्या सेवन न करण्याचा सल्लाही देण्यात आला.