जखमेचे घाव भरण्यास मदत करेल नवा बायोप्रिंटर

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन – खोलवर वा भाजल्याने झालेल्या जखमा आणि मधुमेही रुग्णाच्या जखमा भरणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. बऱ्याचदा अशा जखमा चिखळतच जातात. त्यांच्यावर वारंवार इलाज करावा लागतो. या दिशेने शास्त्रज्ञांच्या हाती मोठे यश लागले असून गंभीर जखमांच्या उपचारासाठी त्यांनी एक खास पद्धत विकसित केली आहे.

शास्त्रज्ञांनी एक अनोखा बायोप्रिंटर तयार केला असून तो थेट जखम झालेल्या जागेवरच त्वचेचा नवा थर बनविण्यास सक्षम आहे. अमेरिकेतील वेक फॉरेस्ट इ्स्टिटट्यूट फॉर रिजनरेटिव्ह मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक सीन मर्फी यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्याचा सहजपणे वापर करता येतो. हा बायोप्रिंटर आरामात एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येऊ शकतो. तो रुग्णांच्या पेशींच्या मदतीनेच जखमेच्या जागी त्वचेची निर्मिती करतो. एका अंदाजानुसार, लष्करी जवानांना बहुतांश जखमा भाजल्याने होतात.

हा बायोप्रिंटर या स्थितीत अतिशय प्रभावी ठरू शकतो. डर्मल फाइब्रोब्लास्ट व एपिडर्मल केराटिनोसाइट्स या प्रमुख त्वचा पेशी सहजपणे जखमी व्यक्तीच्या शरीराच्या एखाद्या निरोगी भागापासून घेतल्या जाऊ शकतात. या पेशींना एका हायड्रोजेलमध्ये मिसळून बायोप्रिंटरमध्ये टाकले जाते. त्यानंतर बायोप्रिंटरची इमेजिंग टेक्नोलॉजी जखमेला स्कॅन करून जखमेच्या कोणत्या भागात कोणत्या पेशींची आवश्यकता आहे, यासंबंधीची माहिती गोळा करते. याच डाटानुसार बायोप्रिंटर जखमेवर थरावर थर त्वचेची निर्मिती करतो.