राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार : एकनाथ शिंदे

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन – सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवून ती सक्षम करणार आहोत. कोल्हापुरातील सेवा रुग्णालय हे खासगी रुग्णालयापेक्षाही अतिशय चांगली व दर्जेदार सेवा देणारे रुग्णालय असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कसबा बावडा, कोल्हापूर येथे सेवा रुग्णालयाच्या नवीन बांधण्यात आलेल्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. पी. धारुरकर आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, परमेश्वरानंतरचे स्थान हे डॉक्टरांचे असते, त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना चांगली सेवा दिली पाहिजे. सरकार सर्वसामान्य माणसाला आरोग्याची सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करत आहे. आरोग्य विभाग दुर्गम भागात अतिशय चांगल्या सेवा देत असून आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही शिंदे म्हणाले. सेवा रुग्णालय ५० बेडचे असून हे रुग्णालय खासगी रुग्णालयापेक्षाही चांगले सेवा देणारे आहे. सेवा रुग्णालयाची इमारत ही अतिशय सुंदर व देखणी असून येथील स्वच्छता पाहून रुग्णांचा आजार निम्मा बरा होत असेल, अशा शब्दात सेवा रुग्णालयाचे कौतुक केले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत ११० कोटी रुपये रुग्णांवर खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ११० लहान मुलांचे हृदयशस्त्रक्रिया केल्या आहेत. सरकारी दवाखाना असणारे हे सेवा रुग्णालय अतिशय चांगली स्वच्छता असणारे रुग्णालय आहे. हे एवढे सुंदर कसे ठेवतात, याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्याकडून घ्यावी लागेल, असे म्हणून त्यांनी रुग्णालयास प्रशस्तिपत्र दिले.

सेवा रुग्णालयात सध्या दोन मजले तयार असून लिफ्ट नसल्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. लिफ्ट तत्काळ बसविण्यात येईल व लिफ्टसाठी येणारा खर्च हा सीएसआर फंडातून देण्यात येईल. तसेच सोनोग्राफी मशीनसाठी सीएसआर फंडातून व्यवस्था केली जाईल, असेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषित केले.

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उप अभियंता धनंजय भोसले, शाखा अभियंता ए. बी. पोळ यांच्यासह रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, लेखा व तांत्रिक कर्मचारी, आरबीएसके टीम, वर्ग चार कर्मचारी, त्याचबरोबर रुग्णालयाच्या सुरुवातीपासून आतापयंर्त रुग्णालयात सेवा दिलेल्या सर्व निवृत्त वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.