Pune : पुण्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक ! ससूनमध्ये एकाच बेडवर 3 रूग्णांवर उपचार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य यंत्रणेवर येऊ लागला आहे. परिणामी अनेक ठिकाणी रुग्णांची हेळसांड होताना पाहायला मिळत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात कोरोनाचा जास्तच प्रकोप झाला असून रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. बेडसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना पळापळ करावी लागत आहे. तर काही रुग्णांना जमीनीवर पडून उपचार घ्यावे लागत आहेत. पुणे शहरामध्ये जिल्ह्यातील आणि इतर ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी येत असल्याने शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आल्या आहेत.

पुण्यात सर्व शासकीय रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांनी हाऊस फुल्ल झाले आहेत. ससून रुग्णालयातील कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये तर भायनक परिस्थिती समोर आली आहे. या ठिकाणी एकाच बेडवर प्रत्येकी तीन-तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे कॅज्युअल्टी वॉर्डची रुग्ण क्षमता 40 एवढी असून दररोज 60 नवीन कोरोनाचे रुग्ण येत आहेत. यामुळे वाढीव ताण वॉर्डवर पडत आहे. रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल झाल्यानंतर या वॉर्डातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये इतरत्र हलवले जात आहे. यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रुग्ण वाढत असताना ससून रुग्णालयात मनुष्यबळाचा दुहेरी फटका रुग्णांना आणि नर्सेसना बसत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने याचा अतिरिक्त ताण रुग्णालयातील नर्सेसवर देखील पडत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण देखील पुण्यात आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहरांमध्ये पुणे शहराचा प्रथम क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पुण्यातील आरोग्य यंत्रणा कंबर कसून लढत आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला असून आरोग्य यंत्रणाच आता व्हेंटिलेटरवर आली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.