उपवासादरम्यान वाढवा रोगप्रतिकारकशक्ती, फक्त ‘या’ पदार्थांचे करा सेवन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना माहामारीचा काळ सुरु आहे. अशातच नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून अनेकजण नवरात्रीचे उपवास करत असतात. हे उपवास शरीराला फायदेशीर ठरत असल्याचे म्हटले जाते. कारण यामुळे शरीराला अनेक गुणकारी फायदे मिळतात. उपवासामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत होऊन शरीराची कार्यक्षमता वाढते. तसेच मसालेदार आणि फास्ट फूडपासून काही दिवसांसाठी लांब राहिल्याने रोगप्रतिकारकशक्ती देखील चांगली सुधारते. सध्या नवरात्रीचे उपास सुरु असून याच दरम्यान कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढेल हे जाणून घेऊयात.

नवरात्रीच्या दिवसात पौष्टिक आहार घ्या, हिरव्या भाज्या, फळांचे सेवन जास्तीत जास्त करा. यामुळे तुम्हाला फक्त फायबर्स मिळतील असं नाही तर हायड्रेट राहण्यासह रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील. यासाठी दोन बदाम, एक अक्रोड, पाच मनुके रोज रात्री भिजत ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खावेत.

सकाळी पूजा झाल्यानंतर पाणी प्यायल्यानंतर एक कप बदामाचा किस घातलेलं दूध किंवा चहाचे सेवन करा. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

एक कप दुधात केळं किंवा सफरचंद मिक्स करुन त्याचा शेक तयार करुन पिल्यास शरीराला चांगला फायदा होतो. घरच्याघरी असा ज्युस तयार करुन पिल्याने याचे अनेक फायदे होतात. केळी नसतील तर तुम्ही चिकूचा देखील वापर करु शकता.

मोसंबी, संत्री, लिंबू यासारख्या आंबट फळांचे सेवन करा. अशा फळांमध्ये व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

दुपारच्या फराळामध्ये शेंगदाणे, नारळ पाण्याचा समावेश करावा. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. शिवाय तुम्ही फळांचा रस किंवा लिंबू पाण्याचे सेवनही करु शकता.

संध्याकाळच्या फराळामध्ये साबुदाण्याची खिचडी किंवा खीरीचे सेवन करायला हवे. डॉक्टर देखील रुग्णांना जेवणात साबुदाण्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा नंतर व्हेजीटेबल सूप पिण्याची सवय ठेवा. सूप पिल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. पोट साफ न होणं, गॅस होणं अशा समस्यांचा सामना करावा लागत नाही.