आपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दुधाच्या फायद्यांविषयी तुम्हाला माहिती आहेच. त्याचे सेवन केवळ हाडेच मजबूत करत नाही तर त्यात अनेक पोषक घटक देखील असतात, जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. हे बर्‍याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे की दुधाचे सेवन आपले आरोग्य उत्तम राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याच्या सेवनाने मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग आणि कर्करोगाच्या अनेक आजारापासून बचाव होतो. आपल्या वयानुसार दररोज किती दूध प्यावे. जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरेल जाणून घेऊया …

मुलाच्या जन्मापासून एक वर्षाच्या वयापर्यंत

मुलाच्या जन्मापासून ते सहा महिन्यांपर्यंत फक्त आईचे दूध द्यावे, असे डॉक्टर सल्ला देतात, कारण या वयात मुलांना अधिक पोषण घटकाची आवश्यकता असते. ती फक्त आईकडून मिळू शकते. तज्ज्ञ म्हणतात की मूल एक वर्षाचे होईपर्यंत त्यांना गायीचे दूध देऊ नये, कारण यामुळे त्यांना बर्‍याच समस्या उद्भवू शकतात.

एक ते तीन वर्ष वयोगट

एका वर्षापासून ते तीन वर्षांपर्यंत, दररोज १०० ते २०० मिलीलिटर दूध द्यावे, जेणेकरुन त्यांना योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळेल. दुधाव्यतिरिक्त आपण मुलांना योग्य प्रमाणात दही आणि दुधाचे पदार्थ देखील देऊ शकता.

चार ते दहा वर्षाच्या वयापर्यंत

चार ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना दररोज २०० ते ३०० मिलीलीटर दूध देणे आवश्यक आहे. यामुळे त्यांची हाडे मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय त्यांना दुधाचे बनलेले पदार्थही देऊ शकता.

अकरा ते अठरा वर्षे

ह्या वयात मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास खूप वेगवान होतो. ज्यामध्ये दुधाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच, अकरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना दररोज किमान तीन कप दूध देणे आवश्यक आहे.

अठरा वर्षावरील लोकांनी दररोज किती दूध प्यावे?

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आईसीएमआरच्या अहवालानुसार, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दररोज दोन ग्लास दूध पिणे आवश्यक आहे, कारण या वयात त्यांना दररोज ६०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. जरी आपण दररोज एक ग्लास दूध पिले तरी हरकत नाही. याशिवाय कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही डाळ, किंवा हिरव्या भाज्या खाऊ शकता.

टीप –   हा सल्ला आपल्याला केवळ सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे. काहीही घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.