Health Tips : उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात अनेक आजार झपाट्याने पसरतात. रखरखत्या उन्हामुळे या दिवसांत हवेत धुळीचे कण मोठ्या प्रमाणात असतात, जे तुमच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी हानीकारक ठरतात. याच कारणामुळे उन्हाळ्यात डोळ्यांचे आजार वाढतात. डोळे जळजळतात, लाल होता, खाजवतात आणि सूजही येते. डोळे हे अत्यंत नाजूक असतात, आपला थोडासाही निष्काळजीपणा डोळ्यांसाठी महागात पडू शकतो.

तापमानात अधिक वाढ झाली तर विविध प्रकाराचे आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते, असे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात. कॅन्जंक्टिव्हायटिसमुळे डोळ्यांचा संसर्ग अंदाजे 30 टक्के वाढत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची निगा कशी राखावी व ते सुरक्षित कसे ठेवायचे याच्या काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

पुढील काही समस्या सर्रास आढळतात

– सुर्यप्रकाशाशी थेट संपर्क येणे

सूर्यप्रकाशामध्ये अतिनिल किरणांचा समावेश असल्याने मोतिबिंदू होण्याचा धोका अधिक असतो, रोटिनाचे नुकसान होण्याची म्हणजे सोलार रेटिनोपॅथीची संभाव्य शक्यताही वाढते. तसेच सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांशी थेट संपर्क आला तर पेरिजिअम म्हणजे कॉर्नियाची अतिरिक्त वाढ करणारा आजार होऊ शकतो.

– डोळे कोरडे पडणे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो व त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते.

अ‍ॅलर्जिक कॉन्जंक्टिव्हायटिस व व्हायरल कॉन्जंक्टिव्हायटिस यामध्ये अचानक वाढ होत असल्याचेही आढळून आले आहे.

वरील धोके लक्षात घेता पुढील काही टिप्सचे पालन करावे

– उन्हाळ्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुरेसे पाणी पिणे, परिपूर्ण आहार घेणे आणि पाणीदार फळे खाणे यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा रोखण्यासाठी मदत होत असल्याने याद्वारे उन्हाळ्यात हायड्रेटेड रहावे.

– डोळ्यांना होणारे कोणतेही नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात. यामुळे सूर्यप्रकाश थेट डोळ्यांपर्यंत जात नाही.

– डोळ्यांना नैसर्गिक ओलावा कायम राहण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. उन्हाळ्यामध्ये त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा ठेवणे शक्य होते.

– व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करा.

– आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई इत्यादींचा वापर करावा. शरीराचा अत्यंत नाजूक भाग असलेल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.