काय सांगता ! होय, चक्क कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन आरोग्य कर्मचारी गेले उसाचा रस प्यायला अन्…(Video)

भोपाळ : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. तर दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका चक्क उसाच्या रसाच्या गाड्यावर थांबल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडला.

एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. मात्र, त्याचदरम्यान त्या रुग्णवाहिकेतील आरोग्य कर्मचाऱ्याने कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन शहरातून फेरफटका मारला. इतकेच नाही तर कोरोनाबाधिताला घेऊन चक्क उसाचा रस पिण्यासाठी रसवंती गृहात पोहोचला. आरोग्य कर्मचारी बराच वेळ उसाचा रस पिण्यासाठी थांबले होता. त्यावेळी गाडीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण अस्वस्थ असल्याचे दिसत होते. तिथे उपस्थित असलेल्या एकाने या प्रकाराचा व्हिडिओ काढला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे सांगण्यात आले आहे. मात्र, या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

मास्कही नव्हताच…
आपण एका कोरोनाबाधित रुग्णाला नेत आहोत याचा विसर त्या आरोग्य कर्मचाऱ्याला पडला होता. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य कर्मचारी मास्क न लावता तसाच उभा राहिला होता.

दोषीविरोधात कारवाई करणार
‘मी व्हिडिओ पाहिला नाही आणि असा काही प्रकार झाल्याचे माझ्यापर्यंत पोहोचले नाही. या प्रकाराची चौकशी करू आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. मेघ सिंह सागर यांनी सांगितले.