दिल्ली हिंसाचाराची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची रात्रीत बदली, दिला होता ‘तो’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – दिल्लीत कायदा सुव्यवस्थाची वासलात लागली असतानाच या हिंसाचाराची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तीची रातोरात बदली करण्यात आली आहे. न्यायमूर्ती एस मुरलीधर असे या न्यायमूर्तीचे नाव आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा व अभय शर्मा या प्रक्षोभक वक्त्यांवर गुन्हे नोंदविण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्यावा असा निर्देश एस मुरलीधर यांच्या खंडपीठाने बुधवारी दिला होता. त्यावर आज गुरुवारी सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे.

राजधानी दिल्ली उसळलेल्या हिंसाचारात दोन पोलिसांसह आतापर्यंत ३० जणांचे बळी घेतले आहेत. पोलिसांनी अटक सत्र सुरु केले असून आतापर्यंत १२० जणांना अटक केली आहे. भाजपच्या नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचे याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर एस मुरलीधर यांनी सुनावणी घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांना आपले म्हणणे गुरुवारी मांडण्याचा आदेश दिला होता.

ही सुनावणी आज होण्यापूर्वीच रात्रीत त्यांची पंजाब -हरियाना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या बदलीची माहिती बाहेर पडताच चर्चेला एकच उधाण आले आहे.
न्या. एस मुरलीधर व न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या याचिकेची सुनावणी झाली होती. तेव्हा याचिकाकर्त्याने ही प्रक्षोभक वक्तव्य करणारे सत्ताधारी पक्षाचे असल्याने पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप केला होता. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाने विपरित आदेश दिल्सास पोलिसांचे मनोबल खच्ची होईल. तपास करुन योग्य वेळी गुन्हे नोंदविले जाईल, असे म्हटले होते. त्यावर मुरलीधर यांनी अशा वेळी तातडीने पावले उचलणे गरजेचे असते. पोलीस कसली वाट पहात आहेत, अशी विचारणा केली होती.

या खंडपीठाने पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यांचे कर्तव्य बजवावेच लागेल. काहीही झाले तरी दिल्लीत १९८४ ची पुनरावृत्ती होऊ दिली जाणार नाही, असेही खंडपीठाने बजावले होते. पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहून गुरुवारी पुढील सुनावणी होईल, असे खंडपीठाने निश्चित केले होते.
खंडपीठाच्या निर्देशाप्रमाणे पोलीस आयुक्तांनी काही निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारने थेट असे निर्देश देणाºया न्यायमूर्तीचीच बदली करुन टाकली आहे. त्यामुळे आज होणाºया या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.