परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे राज्याचे पोलीस महासंचालक (होमगार्ड) परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. परमबीर सिंह यांची याचिका निश्चित केली असून सर्वोच्च न्यायालयात त्यावर उद्या (24 मार्च रोजी) सुनावणी होणार आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन आपल्याला आकसाने हटविण्यात आले, ती बदली रद्द करावी, अशीही विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांना घरी बोलावून त्यांना हॉटेल, बार आणि अन्य आस्थापनांकडून १०० कोटी रुपये दरमहा गोळा करुन देण्यास सांगितले होते, असा आरोप केला आहे. याप्रकरणी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात सुमारे १३० पानाची याचिका दाखल केली असून त्यात त्यांनी या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. आपली बदली आयपीएस सेवानियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय घेते, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.