Jalgaon News : अवघ्या सहा महिन्यात हृदयविकाराने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- अवघ्या सहा महिन्यात एकाच कुटुंबातील तिघांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भडगावातील महिंदळे (जि. जळगाव) गावात घडली आहे. तिघांच्या मृत्यूचे एकच कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भडगावातल्या महिंदळे या छोट्याशा गावातील प्रल्हाद नथ्थू देवरे- पाटील यांचे कुटुंब पोरक झाले आहे. देवरे पाटील यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य मोलमजुरी करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. आई वडील, पत्नी आणि दोन मुल असे हे छोटेखानी कुटुंब होत. मात्र घरात हृदयविकाराचा राक्षस शिरला आणि अख्ख कुटुंबच उदध्वस्त झाले. हृदय विकाराच्या झटक्याने कुटुंबातला पहिला बळी गेला तो प्रल्हाद यांचे वडील नथ्थू देवरे पाटील यांचा. त्यांच्या मृत्यूला दोन महिनेही होत नाहीत तोच पत्नी संगीताबाई यांचाही हृदयविकारानेच मृत्यू झाला. आता मुलांचा सांभाळ कसा होईल, या विवंचनेत प्रल्हाद देवरे पार खचून गेले. आई जनाबाईंनी त्यांना या दु:खातून सावरण्याच बळ दिले होते. पण नियतीला तेही आवडले नाही. मुलगा आणि नातवांसाठी स्वयंपाक करता करताच या माऊलीला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला.