प्रेमवीराने केली हृदय चोरल्याची तक्रार ; पोलिसही पडले बुचकळ्यात 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आतापर्यंत तुम्ही पैसे दागिने मौलयवान वस्तू चोरीला गेल्याच्या घटना पहिल्या आणि ऐकल्या असतील. पण नागपुरात एका प्रेमवीराने चक्क तरुणीने हृदय (मन) चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पण आता या गुन्ह्याचा तपास करायचा कसा असा यक्ष प्रश्न पोलिसांना पडला. या घटनेचा खुलासा नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केला.

नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय हे एका कार्यक्रमात आले होते. तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात घडलेला हा किस्सा सांगितला. तो ऐकून उपस्थितांमध्ये देखील एकच हशा पिकला. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वी रुटीन काम सुरू असताना एक तरुण आला. तो चोरीच्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. त्यामुळे पोलिसांनी नेहमीप्रमाणे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. पण, त्या तरुणाने आपली आपबिती सांगितली. यात त्याने एका तरुणीवर हृदय (मन) चोरल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर त्याने तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली.

हे ऐकून पोलीसही बुचकळ्यात पडले. समाजात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांसाठी पोलिसांकडे कलमं आहेत. ज्या अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींविरुद्ध कारवाई केली जाते. पण, हे प्रकरणच जरा वेगळं होत. त्यामुळे त्या तरुणीवर कोणता गुन्हा दाखल करायचा, असा भीषण प्रश्न त्या पोलिसांसमोर निर्माण झाला. त्या तरुणाची समजूत काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. शेवटी डोकं खाजवतच ते पोलीस अधिकारी आपल्या वरिष्ठांकडे गेले आणि त्यांनी आपली व्यथा त्यांच्या पुढ्यात मांडली. तसेच त्या तरुणाला समुपदेश करण्याची हात जोडून विनंतीही केली.