वर्धा : पत्नीचे दागिने गहाण ठेऊन केली पेरणी, शेतकर्‍यानं बैलांऐवजी स्वतःलाच जुंपलं

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कामाला लागला आहे. पेरणीसाठी बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या अडचणी सुटल्या नाही आहेत. खरिपाचा हंगाम सुरु झाला असून, हाताशी पैसा नाही आणि जो होता तो सर्व पैसा आपल्या कॅन्सरग्रस्त मुलाचा जीव वाचविण्यासाठी घालवला. आता पुढे काय करायचं ? या पेचात अडकलेल्या शेतकऱ्याने पत्नीचे दागिने गहाण ठेऊन पेरणी केली आहे. गहाण ठेवलेल्या दागिन्यांतून बियाणे आणि खते एवढीच खरेदी झाली, आणि काकरे फाडण्याच्या कामात बैलां ऐवजी मात्र स्वतःलाच जुंपलं.

वर्धा जिल्ह्यातील नारा येथील शेतकरी असलेल्या रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यावरती त्यांनी २००८ साली पीककर्ज घेतलं, तेव्हापासून परिस्थितीच्या कारणामुळे कर्ज फेडू शकले नाही. सरकारने कर्जमाफी केली पण त्यामध्ये आमची कर्जमाफी झाली नाही. म्हणून बँकांनी पुन्हा शेतीवर कर्ज दिलं नाही. अशी व्यथा शेतकरी रमेश यांनी मांडली. दरम्यान, शेतीत पेरणी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे रमेशने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील पोत कानातले, सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्या आलेल्या पैशातून फक्त शेतीसाठी बियाणे व खत घेतले. शेतीत लागवड करण्यासाठी बैलजोडीची गरज असते, मात्र त्याचं भाडं देणं होत नसल्याने रमेशने स्वतः काकरी बनवली आणि दिवसभर बैलासारखी ओढून कपाशी लागवडीसाठी शेतात काकर फाडले. नंतर त्यांच्या पत्नीने आणि पुतण्याने कपाशी लागवड करण्यात मदत केली.

रमेश यांनी पुढं सांगितलं की, अचानक माझ्या मुलाला ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजराने ग्रासलं. जेवढे पैसे होते तेवढे त्याच्या आजारासाठी खर्च केलं. अनेकांनी आर्थिक स्वरुपात मदत केली मात्र अक्षयने अखेर जगाचा निरोप घेतला. त्याच्या आजारासाठी अनेकांकडून कर्ज घेतले. आता खरीप हंगामाला सुरुवात झाली शेती पेरणी करायची कशी हा प्रश्न आ वासून पुढं उभा राहिला. म्हणून पत्नीच्या गळ्यातील पोत, कानातले गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून शेती करत आहे, असं त्यांनी म्हटलं.