जालना : गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या 3 भावांचा शॉक लागून विहिरीत पडून मृत्यू, भोकरदन येथील घटना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पळसखेडा पिंपळे (ता. भोकरदन) येथे तीन सख्या भावांना विजेचा शॉक लागून विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. एकमेकास वाचविण्यात तिघांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातील तिघांचा मृत्यू होणे हे धक्कादायक आहे. या बातमीमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मन हेलावून टाकणारी ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेडा पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (२६), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (२६) सुनील आप्पासाहेब जाधव (१८) या तिघांचा मृत्यू झाला. नवीन आयुष्याची नुकतीच सुरुवात केली होती. मृत झालेल्या तिन्ही भावांपैकी ज्ञानेश्वर हा सर्वात मोठा होता. तीन महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता. नवीन आयुष्याला नुकतीच सुरुवात झाली होती. घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. रामेश्वर आणि सुनील हे दोघे औरंगाबादेत कंपनीत काम करीत असत. कोरोनामुळे सुरक्षितता म्हणून त्यांनी कंपनीतील नोकरी सोडली व ते गावी आले. लॉकडाउनमुळे ते शेती करू लागले. नऊ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर, रामेश्वर, सुनील हे तिघे भाऊ शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देण्यासाठी कान्हेरीवरील विद्युत पंप सुरू केला. त्यावेळी क्षणार्धात त्याला विजेचा शॉक लागला आणि तो बाजूलाच असलेल्या विहिरीत कोसळला ही बाब अन्य दोन भावांच्या लक्षात आली त्याला वाचविण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी घेतली मात्र तिघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला.

मुले घरी का आली नाहीत म्हणून घरची मंडळी चिंता करू लागली. तिघांपैकी कोणीच फोनवर प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, त्यांनी ही बाब नातेवाईकांना व आपल्या आसपास असलेल्या नागरिकांना सांगितलं. त्यानंतर मध्यरात्री त्यांच्या शोधासाठी गावातील लोक गेले तेव्हा त्यांना ही तिन्ही भाऊ विहिरीत पडलेले दिसले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे.

यासंदर्भात हसनाबाद पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे दाखल झाले. घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत.