धक्कादायक ! सासरच्या मंडळीनीच गरोदर महिलेची गोळ्या झाडून केली निर्घृण हत्या, पतीसह तिघांना अटक

पोलीसनामा ऑनलाईनः एका 5 महिन्याच्या गर्भवती महिलेची सासरच्या मंडळीनी गोळ्या घालून निर्घूण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर शहरातील जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. 7) सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीच्या अटकेची मागणी करत माहेरच्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला व रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले. पोलिसांनी मृत महिलेच्या सासू आणि दीराला ताब्यात घेतले आहे. तर तिच्या पतीला तीन दिवसापूर्वीच अटक केली आहे.

पल्लवी अंशुल छाबडा असे खून झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हेमराज चंद्रभान मिधा (रा. अनुपगड) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर यापूर्वीच मृत महिलेच्या पती अंशुलविरोधात पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला आणि मारहाणीच्या प्रकरणात आरोप होता. ज्याला तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पल्लवीचे अंशुल छाबडासोबत 17 मे 2020 रोजी लग्न झाले होते. पल्लवी 5 महिन्यांचा गरोदर होती. लग्न झाल्यापासून माहेरहून सोन, कार आणि इतर वस्तू आण म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होता. त्यामुळे ती खूप दबावात होती. गरोदर असतानाही आरोपींनी तिला मारहाण करत असत, घरात बंद करून ठेवले जात असत. रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान सासू, दोन दीर, आणि अन्य दोघा व्यक्तींनी तिची गोळ्या घालून हत्या करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सीओ सिटी व जवाहरनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी विश्वजित सिंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला. मृत महिलेची सासू आणि दीर यांना शोधून काढण्यात आले आहे. दरम्यान उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आरोपींना अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.