धक्कादायक ! ब्रेकअपच्या दु:खात 30 हजार फूटांवर तोडली विमानाची खिडकी

बिजिंग : वृत्तससंस्था – प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतर कोण काय करेल याचा नेम नाही. आपलं दु:ख वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त केले जाते. प्रसंगी प्रेमात धोका देणाऱ्याचा काटा देखील काढला जातो, हे आपण ऐकले असेल. मात्र, चिनमधील बिजिंगमध्ये एक अजबच प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. प्रेमात ब्रेकअप झाल्याने एका प्रवासी महिलेने चक्क विमानातील इतर प्रवाशांचे प्राण धोक्यात आणले. ब्रेकअपच्या दु:खात या महिलेने मद्य प्राशन करून विमानाची खिडकी तोडली. या महिलेने ज्यावेळी खिडकी तोडली त्यावेळी विमान तब्बल 30 हजार फूट उंचीवर होते. तिच्या या पराक्रमामुळे विमानाला एमर्जन्सी लँडिंग करावी लागली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव ली असून ती लूंग एअरलाइन्सने प्रवास करत होती. विमान प्रवासादरम्यान तिने अतिप्रमाणात मद्य प्राशन केले. त्यानंतर ही महिला मोठमोठ्याने रडू लागली . रडत असतानाच या महिलेने विमानातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विमानातील इतर प्रवाशांनी आणि क्रू मेंबर्सनी या महिलेला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिने विमानाच्या खिडकीवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली.

या महिलेला मोठ्या प्रयत्नानंतर जागेवर बसवण्यात यश आले. महिलेला जागेवर बसवले मात्र, तोपर्यंत या महिलेने विमानाच्या खिडकीच्या काचेचे नुकसान केले. खिडकीच्या काचेला तडे गेल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने पायलटने विमानाचे एमर्जन्सी लँडिंग केले. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने विमानात बसण्याआधीच चीनमध्ये स्थानिक मद्य बाईजियू प्यायली होती. जवळपास अर्धा लिटरहून अधिक प्रमाणात तिने हे मद्य सेवन केले होते. या महिलेकडे पोलिसांनी चौशी केली असता महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या प्रियकराने ब्रेकअप केल्यामुळे ती दु:खी होती. त्यातच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने सांगितले. सोशल मीडियावर या महिलेचा फोटो आणि तडे गेलेल्या विमानाची खिडकीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.