राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार ‘बॅटिंग’ ! मतदानासाठी केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची होतेय अडचण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. धरणे काठोकाठ भरली असल्याने या पावसामुळे काही धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उजनी धरणातून २१ हजार क्युसेस पाणी नदीत सोडण्यात येत आहे. तसेच घोडनदीतून १२०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खडकवासला येथे ८४ मिमी, टेमघर ३६, वरसगाव ३८, पानशेत ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वीर धरण परिसरात ७५ मिमी, भाटघर ४८ मिमी पाऊस झाला आहे.

कृष्णा खोऱ्यात ही सर्वत्र पावसाची जोरदार बरसात होत आहे. धोम धरण परिसरात ६२, कण्हेर ८२, पाटगाव ४९, उरमोडी ६९, तारळी १३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सातारा ८९, कोल्हापूर ४६.४, पुणे ३८, अहमदनगर २३, सांगली १९, सोलापूर १५, महाबळेश्ववर ३२, नाशिक ११, हर्णे ५९, मुंबई १५, सांताक्रुझ १८, रत्नागिरी ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ औरंगाबाद २७, बीड ५२, परभणी ९ मिमी, विदर्भातील बुलढाणा १९, चंद्रपूर २४, अकोला ९, गडचिरोली ११, नागपूर ८, वाशिम ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ईव्हिएम मशीन व अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जाण्याची कर्मचाऱ्यांची तयारी सुरु आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य व ईव्हिएम वितरण केंद्र तयार करण्यात आले आहे. तेथे सकाळपासून हे साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाने त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागत आहे. उद्याही मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

visit : Policenama.com