मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आणि परिसरात काल किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आज कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिमुसळधार तर मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका असा सल्लाही देण्यात आला आहे.

मुंबई परिसरात 24 तासांत अनेक ठिकाणी मुसळधार (65 ते 115 मिमी) पावसाची नोंद झाली. मात्र दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला. पश्चिम उपनगरे, ठाणे, डोंबिवली-कल्याण, मीरा-भाईंदर येथे 10 ते 20 मिमी, नवी मुंबईत पाच ते 10 मिमी तर दक्षिण मुंबईत केवळ पाच मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.