राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवडयात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवडयात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही.

मुंबई आणि महानगर परिसरात काल हलक्या पावसाचा शिडकावा झाला. दिवसभरात मुंबई शहर आणि उपगनरात पाच मिमीपर्यंत, ठाणे आणि परिसरात पाच ते दहा मिमी, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली परिसरात पाच मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. दरम्यान, 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या आठवडयात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडयात पावसाची हजेरी लागू शकते. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल. त्यानंतरच्या आठवडयात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याजवळच्या जिल्ह्यंमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे . राज्यात पावसाला पोषक स्थिती असून, येत्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.