राज्यात पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसही सरासरीच्या तुलनेत मागे पडला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातार्‍यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे.

विदर्भात दोन-तीन जिल्हे वगळता सर्वच भागांत पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे आहे. मराठवाडयात मात्र पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर जूनच्या शेवटपर्यंत आणि जुलैच्या पहिल्या आठवडयात राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे जवळपास सर्वच ठिकाणी जूनच्या पावसाची सरासरी भरून निघाली होती. जुलैच्या दुसर्‍या आठवडयानंतर अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. मुंबई परिसर, कोकणातील काही भाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढ थांबली असून, शेतकर्‍यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. कोकण विभागातील पालघर, रायगड आणि ठाणे हे तीन जिल्हे जुलैच्या दुसर्‍या आठवडयापासून सरासरीच्या तुलनेत पावसात मागे पडले आहेत. या भागांत 15 ते 35 टक्के पाऊस उणा आहे. रत्नागिरीत हंगामातील पाऊस सरासरी इतका असला, तरी तो मागे पडत चालला आहे.