राज्यात 18 जूनला मुसळधार पाऊस, हवामानशास्त्र विभागाचा इशारा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वाऱ्याचा वेग वाढल्याने गुरुवारी (दि.18) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय वामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पुढील 24 तासात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरात पाऊस होईल असा अंदाज असल्याने रेड ते ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवार पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. बुधवारी सकाळी मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पावसाचा जोर गुरुवार पर्यंत कायम राहणार आहे. जिल्ह्यात बुधवारी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासात सरासरी 52.22 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि सोनवी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर बाजारपेठेत आणि रामपेठ परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदारांच्या सूचनेनुसार दोन घरे खाली करण्यात आली असून एका कुटुंबाला सकाळपर्यंत स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवस अधिक मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे.