सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पुणेकरांना झोडपून काढलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून रात्रभर या पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहरात २४ ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. पार्किंगमध्ये व घरामध्ये पाणी शिरले होते. या पावसाबरोबर जोरदार वाऱ्यामुळे १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.

या पावसाने शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. धो धो कोसळणाऱ्या पावसाने शहरातील सर्वच ओढ्यांना पूर आला असून खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत नसतानाही या पावसामुळे बंडगार्डन येथून ४ हजार ३५९ क्युसेस पाणी वाहत होते.

खडकवासला ७५, पानशेत ५९, वरसगाव ५७, टेमघर ५२, कासारसाई, कळमोडी ७१, भाटघर ६८, पुरंदरमधील नाझरे धरणात ६२ मिमी पावसानी नोंद झाली होती. धरण क्षेत्रापेक्षा पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर खूप होता.

मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाकड ९०, पाषाण ८५, ताथवडे ७०, चिंचवड ६७, शिवाजीनगर ६३, येरवडा ५७, आळंदी ४३, एनडीए ४१, वडगाव शेरी ३३ मिमी पावसची नोंद झाली होती. त्यानंतरही रात्रभर पाऊस कोसळत होता. अनेक ठिकाणी रस्त्याला नदीसारखे स्वरुप आले होते. या पाण्याला इतका जोर होता की, त्यात काही ठिकाणी दुचाकी पाण्याबरोबर वाहून दूर गेल्या होत्या.

Visit : policenama.com