आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर वाढणार ! जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठवाड्यातील काही भागांमध्ये 2 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळं काही गावांचा संपर्कही तुटला होता. मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसानं उसंत घेतली असली तरी राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचं धूमशान सुरू आहे. येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहिल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

संपूर्ण राज्यात या आठवड्यात मध्यम स्वरूपाचं तर मुंबई ठाण्यात काही वेळा ढगाळ वातावरण असेल. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मागील 2 दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती.

18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांध्ये ढगाळ वातावरण असेल आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील.