मुंबईत अतिवृष्टी : 9 तासात तब्बल 194 मिमी पाऊस, सावंतवाडी 370, रत्नागिरीत 360 मिमी पावसाची नोंद

मुंबई : तोक्ते चक्रीवादळ सोमवारी सकाळी कोकणातून गुजरातच्या दिशेने जात असताना त्याचा मोठा परिणाम मुंबई शहरावर झाला असून आज दिवसभरात मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रुझ येथे १८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग येथे १०५ मिमी, तर डहाणु येथे ७३ मिमी पाऊस झाला. त्याचवेळी रत्नागिरीत दिवसभरात १५ मिमी पाऊस झाला आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईत केवळ ११ मिमी पावसाची नोंद झाली होती.

तोक्ते चक्रीवादळाने गोव्यासह कोकणात रविवारी रात्रभर मोठी वाताहत केली. त्यानंतर ते किनारपट्टीपासून दूर जाऊ लागले तरी त्याची तीव्रता वाढत जात होती. त्यामुळे त्याचा परिघात येणार्‍या अलीबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. अजूनही मुंबईत पाऊस सुरु आहे.

सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात सावंतवाडी ३७०, रत्नागिरी, ३६०, दोडामार्ग २५०, पणजी २३०, मालवण २१०, कुडाळ २००, देवगड २००, कणकवली १९०, वेंगुर्ला १८०, म्हापसा १७०, लांजा १६०, वैभववाडी १७०, संगमेश्वर १४०, गुहागर १२०, दापोली ८०, महाबळेश्वर ८४, कोल्हापूर ४०, औरंगाबाद २३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

कोकणातील पाऊस आता थांबला असून मुंबई व उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. पालघरमध्ये जोरदार पाऊस पडत असून उद्याही येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.