मुंबईच्या उपनगरात पावसाचे थैमान, अनेक वाहने पाण्यात डुबली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबई-ठाण्यासह उपनगरात पहाटेपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आज चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. आज पुन्हा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अनेक वाहने पाण्याखाली गेली आहेत.

कुलाबा वेधशाळेने मुंबई, ठाणे आणि रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री पासून रिमझिम पाऊस सुरू होता. पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे मीरारोड परिसरात कंबरेएवढे पाणी साचले आहे.

अनेक दुचाकी पाण्याखाली गेल्या असून नागरिकही या पाण्यातून वाट काढत जात असल्याचे दिसून आले. तर अनेक सखल भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबई-गुजरात महामार्गावर नायगाव इथे मुसळधार पाणी साचले आहे. यामुळे पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागत आहे. महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.