रात्रभर पावसामुळे मुंबईत रस्ते जलमय, लोकलसेवा ठप्प

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. काल सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने रात्रीही जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. परंतु संध्याकाळनंतर पावसाचा जोर अचानक वाढला. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे बेस्टची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. मुंबईत सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा परिसरात 122.2 मिमी आणि सांताक्रुझ येथे 273.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.