मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात पावसाची उघडकीस होत असतानाच मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत.